धर्मावर कविता | Poem on Religion in Marathi

Posted on

धर्म

तिथे नाही धर्म । जिथे हिंसाचार ।

धर्म सदाचार । शिकवतो ।।

मारणे सोडून । प्रेम देत जावे ।

समतेचे गावे । गीत सदा ।।

क्रोध, अभिमान । नाही करायचे ।

सत्य बोलायचे । दरवेळी ।।

डोळे, कान, नाक । शुद्ध सदा ठेवा ।

माणसांची सेवा । करताना ।।

माणुसकी ठेवा । आपल्या हृदयी ।

संकट समयी । भिऊ नका ।।

दया, क्षमा, शांती । प्रत्येक धर्मात ।

सर्वांच्या मनात । हेचि असो ।।

स्वानुभवे करा । ज्ञान आत्मसात ।

सदा वाचनात । मग्न व्हावे ।।

धर्म माणुसकी । नाही त्यात स्वार्थ ।

धर्मासाठी पार्थ । लढा देतो ।।

अजु कर्मामध्ये । धर्म आहे जाण ।

कर्मची महान । सर्वांपेक्षा ।।

©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी,

Leave a Reply