राज्यात ५ मेपर्यंत पावसाचा अंदाज

राज्यात सर्वत्र तापमानात घट नोंदविण्यात आली असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची नोंद होत आहे.  येत्या शुक्रवापर्यंत (५ मे) हीच स्थिती कायम राहून कोकण आणि गोवा वगळता विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. 

राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाडय़ासह सर्वच ठिकाणी कमाल तापमानातील घट कायम आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी या महिन्यात ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले होते. गेल्या आठवडय़ात भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यातील कमाल तापमानात सुमारे दोन ते चार अंश सेल्सिअसची घट होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार राज्यात सर्वत्र कमाल तापमानात घट नोंदवण्यात आली.